इबोला व्हायरस

 


इव्हीडी अर्थात इबोला व्हायरस डिसीज पूर्वी हाइमॉरहॉजिक फिवर म्हणून ओळखला जायचा. हा अत्यंत गंभीर संसर्गजन्य रोग असून यात 90 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. माणूस आणि माकडे, गोरिला आणि चिम्पांझी आणि फ्रूट बॅट ही वटवाघुळाची जात यांना या रोगाची लागण होते. इबोला हा फिलोव्हिरिडी कुळातल्या 3 सदस्यांपैकी एक सदस्य असून याच्या 5 प्रजाती आहे.

(1) बुंदीबुग्यो
(2) झायरे
(3) रेस्टॉन
(4) सुदान
(5) ताय फॉरेस्ट.

पश्चिम आफ्रिकेतल्या देशात इबोलाने थैमान घातले असून याची लागण झालेल्या तसेच यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची ताजी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कसा पसरतो

चिम्पांझी, गोरिला, माकडे, जंगली हरिणे अशा संसर्ग झालेल्‍या प्राण्यांच्या रक्ताशी, अवयवांशी, लाळेशी, मलमूत्र किंवा शरीरातून होणाऱ्या अन्य स्रावांशी संपर्क आल्यास हा रोग मानवांमध्ये पसरतो. संसर्ग झालेल्या माणसाच्या रक्ताशी, लाळेशी, मलमूत्र आदी शारीरिक स्रावांशी संपर्क झाल्यास, व्रण उमटलेल्या त्वचेशी थेट स्पर्श झाल्यास या रोगाची लागण होऊ शकते.

लक्षणे

ताप, कमालीचा थकवा, सांधेदुखी, डोकेदुखी, घसा सुजणे, उलटया, जुलाब, पुरळ, मूत्रपिंड आणि यकृताच्या कामावर परिणाम आणि काही वेळेस अंतर्गत व बाहय रक्तस्राव प्रयोगशाळांमधल्या नमून्या पांढऱ्या पेशी आण प्लेटलेटसची संख्या कमी झाल्याचेही आढळून आले आहे. इबोला विषाणूचा शरीरात प्रवेश, त्याची वाढ व लक्षणे दिसण्यापर्यंतचा कालावधी 2 ते 21 दिवस असतो.

निदान

इबोलाची लागण झाली आहे का ? याबाबत निष्कर्ष काढण्यापूर्वी रुग्णाला मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, लेप्टोस्पाइरोसिस, प्लेग, रिकेटोसि, मेंदुज्वर, हेपिटाइटिस आणि इतर विषाणूजन्य तापाची लागण झालेली नाही ना, याची खात्री करुन घेणे आवश्यक ठरते. प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या अनेक चाचण्याद्वारे या रोगाचे निदान करता येते. मात्र अशा रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी करणेही अत्यंत धोकादायक असते आणि यासाठी आवश्यक ती संपूर्ण खबरदारी घ्यावी लागते.

प्रतिबंध आणि नियंत्रण

इबोलाची लागण न झालेल्या व्यक्तींबरोबर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यात कोणताही धोका नाही. पैशांची, सामानाची देवाण-घेवाण यांच्या माध्यमातून इबोलाची लागण होत नाही. स्विमिंग पूलामधूनही या रोगाची लागण होत नाही. डासापासून इबोलाचा फैलाव होत नाही. इबोलाचा विषाणू साबण, ब्लिच, सूर्यप्रकाश यामुळे सहज मरतो. सुर्यप्रकाशामुळे कोरडया झालेल्या पृष्ठभागावर इबोलाचा विषाणू काही क्षणच जिवंत राहू शकतो. इबोलावर अजूनही प्रभावी उपचार पध्दती किंवा मानवी लस उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची लागण न होणे हाच त्यापासून बचाव करण्याचा उपाय आहे. माकडे आणि इतर जंगली प्राण्यांशी संपर्क टाळला पाहिजे. त्यांचे कच्चे मांस खाऊ नये. प्राण्यांना ग्लोवज घालून तसेच इतर संरक्षक आवरणे शरीरावर चढवून हाताळणे. प्राणीज पदार्थ (रक्त आणि मांस) पूर्णपणे व्यवस्थित शिजवूनच खावेत. इबोलाची लागण झालेल्या रुग्णाशी थेट शारीरिक संपर्क टाळावा. अशा रुग्णाची काळजी घेताना संरक्षक साधनसामग्री शरीरावर चढवावी आणि जैवसुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याची विल्हेवाट लावावी. रुग्णाची सेवा केल्यानंतर, रुग्णालयात जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. मृत रुग्णावरचे अंत्यसंस्कार जैवसुरक्षेची काळजी घेऊन करावेत.

इबोला रुग्णाच्या रक्ताशी आणि इतर स्रावाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे इबोलाची लागण होऊ शकते. याचा सर्वाधिक धोका वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना असतो. प्रत्येक वेळेस इबोलाचे तात्काळ निदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सर्वच रुग्णांबाबत प्रमाणित प्रतिबंधात्मक दक्षता बाळगणे क्रमप्राप्त ठरते. प्राथमिक स्वच्छता व काळजी, श्वसन यंत्रणेच्या बचावाची काळजी, संरक्षण साधनसामग्रीचा वापर, इंजेक्शन देताना घ्यावयाची काळजी, संसर्ग झालेल्या मृत रुग्णाची हाताळणी याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णापासून एक मीटरच्या आत संपर्क येणाऱ्या व्यक्तीने मेडिकल मास्क व गॉगल्स चढवणे आवश्यक आहे. तसेच लांब बाहयांचा गाऊन आणि ग्लोव्हज घालणेही आवश्यक आहे.

प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धोका असल्यामुळे संशयित नमुने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी आणि सुसज्ज अद्ययावत प्रयोगशाळेतच तपासले जाणे आवश्यक ठरते.
इबोला व्हायरस 4.5 5 MPSC Guidelines इव्हीडी अर्थात इबोला व्हायरस डिसीज पूर्वी हाइमॉरहॉजिक फिवर म्हणून ओळखला जायचा. हा अत्यंत गंभीर संसर्गजन्य रोग असून यात 90 टक्के रुग्ण...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा